ऑनलाइन परवाना सुविधेचा  लाभ घ्या

  • नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे उद्योगांना आवाहन

नवी मुंबई, 30 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील व्यापारी आणि उद्योगधंद्यांना व्यवसाय परवाना आणि साठा परवाना सुलभरित्या उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेतर्फे सुरु करण्यात आलेल्या ऑनलाइन परवाना सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

  • महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 313 अन्वये व्यापार / उद्योगधंदा परवानगी व कलम 376 नुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या परवाना विभागामार्फत व्यवसाय परवाना आणि साठा परवाना दिला जातो. नागरिकांना / व्यावसायिकांना परवाने मिळवणे सुलभ व्हावे यासाठी महापालिकेने ऑक्टोबर 2016 पासून विविध परवाने आणि नुतनीकरणासाठी जानेवारी 2017 पासून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 

  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने या बाबत एकुण 12 सेवा दिनांक 29/09/2017 रोजीच्या अधिसूचनेव्दारे अधिसूचित केलेल्या असून Ease of doing business च्या अनुषंगाने या सेवांसदर्भात आवश्यक कागदपत्रे, नियत कालमर्यादा इत्यादी माहिती सदर अधिसूचनेत नमूद केलेली आहे.

 

  • नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यावसायिक परवाना / परवानगी घेण्यासाठी नमुंमपाचे संकेतस्थळwww.rtsnmmconline.com किंवा www.nmmc.gov.in यावरील उपलब्ध सुविधेचा वापर करून नागरिक आपले ऑनलाईन (Online) अर्ज सादर करू शकतात. या लोकसेवा प्राप्त करण्यासाठी व्यावसायिकांनी स्वत: अर्ज सादर करावयाचे असून कोणत्याही दलालामार्फत अथवा कन्सल्टन्ट मार्फत अर्ज सादर करू नयेत,असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

 

  • अर्जदाराने व्यापार / उद्योगधंदा परवानगी, व्यवसाय परवाना आणि साठा परवाना मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर अधिसूचनेत नमूद केल्यानुसार विहित मुदतीत संबंधित विभाग कार्यालयांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने परवाने / परवानगी तसेच त्यांच्या नुतनीकरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

  • या सेवांसाठी प्रथम अपिलिय अधिकारी म्हणुन उप आयुक्त (परवाना) व व्दितीय अपिलिय अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त (शहर) यांना नामनिर्देशित करण्यात आलेले आहे.

 

  • विना परवाना / परवानगी व्यवसायांवरील कारवाई टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळाचा वापर करून परवाने प्राप्त करून घ्यावेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.