महापालिका प्रशासनाविरोधात मनसे करणार नगररचना सचिवांकडे तक्रार
नवी मुंबई, 27 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती सदस्यपदी बिगर राजकीय संघटनांचे प्रतिनिधी आणि समाजिक कार्यकर्ते यांची निवड होणे अपेक्षित असताना राजकीय पक्षांतील असंतुष्टांची वर्णी सदस्यपदी लावली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले असून याविरोधात राज्याच्या नगर रचना सचिवांकडे मनसेच्या वतीने तक्रार करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सदस्यपदासाठी नुकतीच निवड प्रक्रीया पार पडली. प्रभाग समिती सदस्य पदाचा अर्ज भरतेवेळस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २९ (अ) अन्वये प्रभाग समित्यामध्ये बिनसरकारी संघटना व समजलक्षी संघटना यांचे प्रतिनिधी यांची नेमनुक करण्याची तरतूद आहे. ( ते कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य पदाधिकारी असू नये असे नमूद आहे.) मात्र याला परंपरेनुसार बगल देत नवी मुंबई मनपातील सत्ताधारींसह सर्वच पक्षांनी आपल्या पक्षातील असंतुष्टांची वर्णी नवी मुंबई मनपा प्रभाग समिती सदस्यपदी लावली असल्याचे म्हणणे मनसेचे सविनय म्हात्रे आणि श्रीकांत माने यांनी मांडले आहे.
विविध प्रभागांवर प्रभाग समिती सदस्यांची निवड करण्याकरिता महानगरपालिकेचे निकष , अहर्ता, नियम , यांना सत्ताधारी पक्ष आणि इतर सर्वच पक्षांनी धाब्यावर बसविले आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सदरच्या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य केल्याने महापालिका प्रशासना विरोधात महाराष्ट्र राज्याच्या नगर रचना सचिवांना तक्रार करणार असल्याचे मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी सांगितले.