- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे नवी मुंबई महापालिकेवर ताशेरे
नवी मुंबई, 20 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
नवी मुंबई महापालिकेच्या सेवेत काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या कल्याणासाठी महापालिका प्रशासनाने ठोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. शिवाय कायमस्वरुपी ८६ सफाई कामगारांच्या घराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त करीत राज्य सफाई कर्मचारी आयोगाने नवी मुंबई महापालिकेवर चांगलेच ताशेरे ओढले.
सफाई कामगारांच्या कल्याणाबाबत शासनाने अधोरेखित केलेल्या सूधारणांची महापालिका स्तरावर योग्यतऱ्हेने अंमलबजावणी केली जात आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या शिष्टमंडळाने आज नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला भेट दिली. या शिष्टमंडळात राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार आणि अन्य सदस्य उपस्थित होते. आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत महापालिका प्रशासन गांभिर्याने विचार करीत नसल्याचे मत व्यक्त केले. सफाई कर्मचा-यांसाठी पागे समितीने केलेल्या शिफारसी लागू करण्यात आलेल्या नाहीत. तसेच कर्मचा-यांना शैक्षणिक पात्रतेनुसार सेवेत बढती दिली जात नाही याबद्दल चिंता व्यक्त केली. कामगारांच्या कल्याणासाठी येत्या 1 वर्षात कर्मचा-यांच्या घरांबाबत अंमलबजवणी करा अशी सूचना आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी केल्या.
महापालिकेकडे घरांबाबत विचारणा केली असता पालिकेकडे जमीन उपलब्ध नाही. नवीन डीपीमध्ये जागा राखीव ठेवली जाईल असे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली.