नवी मुंबईतील जुईनगरमध्ये बँकेवर दरोडा
भुयार खोदून बँकेतील 30 लॉकर्स लुटले
नवी मुंबई, 13 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
नवी मुंबईमधील जुईनगर सेक्टर 11 येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेवर दरोडा टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बँकेशेजारील दुकानाजवळ खड्डा खणून, तिथून बँकेपर्यंत भुयार खणून बँकेतील तब्बल 30 लॉकर्स लुटण्यात आले आहेत. दरोडेखोर फरार असून सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे.
जुईनगर सेक्टर 11 येथील भक्ती रेसिडेन्सी या सोसायटी खाली बँक ऑफ बडोदाची जुईनगर शाखा आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने बँक बंद होती. आज सकाळी (13 नोव्हेंबर) एक ग्राहक जेव्हा आपलं लॉकर उघडण्यासाठी लॉकर रुममध्ये गेला, त्यावेळी आजूबाजूचे 30 लॉकर्स तोडल्याचं दिसून आलं. 225 लॉकर पैकी 30 लॉकर्सवर चोरट्यांनी हात साफ केला आहे. या सर्व लॉकरमध्ये सोन्याचे दागिने होते. बॅंकेला दोन दिवस सुट्टी होती त्यामुळे दरोडा शनिवारी की रविवारी टाकण्यात आला हे स्पष्ट झाले नाही. बँकेच्या शेजारी असलेल्या खाद्य पदार्थाच्या दुकानातून चोरट्यांनी भुयारी मार्ग बनवला आणि तिथून प्रवेश करत बँकेवर दरोडा घातला अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानात या भुयाराचे उगमस्थान आढळून आलंय. हे भुयार एका रात्रीत खोदलं गेलं नाही. त्यासाठी अनेक दिवस लागले असतील. पूर्ण प्लॅनिंग करूनच हे भुयार खोदण्यात आले असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.