- कंत्राटी कामगारांची घणसोली विभाग कार्यालयासमोर निदर्शने
नवी मुंबई, 1 नोव्हेंबर 2017/AV News Bureau:
महापौर सुधाकर सोनवणे यांच्या आदेशावरून घणसोली विभागातील उद्यानात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकल्याचा निषेध करण्यासाठी कंत्राटी कामगारांना विभाग कार्यालयासमोर आज निदर्शने केली. तसेच यावेळी महापौरांविरोधात कामगारांनी घोषणाही दिल्या. दरम्यान, काढून टाकलेल्या कामगाराना पुन्हा सेवेत घेवून त्यांची थकबाकी देण्याचे आश्वासन विभाग अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले.
काही दिवसांपूर्वी घणसोली विभागातील उद्यानात काम करणाऱ्या दोन कंत्राटी कामगारांना कामात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई महापौर सुधाकर सोनवणे यांच्या आदेशावरून झाल्याचा आरोप कंत्राटी कामगारांनी केला होता. या कारवाईमुळे कामगारांमध्ये सोनवणे आणि महापालिका प्रशासनाविरोधात असंतोष पसरला होता. या असंतोषाचा आज भडका उडाला आणि कंत्राटी कामगारांनी घणसोली विभाग कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करीत महापौर सुधाकर सोनवणे यांच्याविरोधात घोषणा दिल्याची माहिती नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस अॅड सुरेश ठाकूर यांनी दिली.
दरम्यान, विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे यांनी कामावरून काढून टाकलेल्या दोन्ही कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेवून त्यांची थकबाकी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कंत्राटी कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतल्याचेही अॅड सुरेश ठाकूर यांनी सांगितले.