मुंबई, 31 ऑक्टोबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
राज्यातील दिव्यांग व्यक्ती योजनांपासून वंचित राहू नये यासाठी राज्यभर दिव्यांग नोंदणीसाठी अभियान सुरू करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद क्षेत्रात यासाठी नोंदणी केंद्रे सुरु करण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरु आहे. याबाबत जिल्हास्तर, विभागस्तरारून आढावा घेतला जाईल. या नोंदणी अभियानाचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज मुंबईत दिले. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतीतून दिव्यांगांसाठी 3 टक्के निधी खर्च करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत भुसे बोलत होते. यावेळी आमदार बच्चू कडू यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जे अधिकारी हा निधी खर्च करण्याबाबत टाळाटाळ करत असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे राज्यमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.
घरकुल योजनेतही आता दिव्यांगानाही प्राधान्य दिले जाईल. याबरोबरच त्यांच्यासाठी लवकरच विशेष योजना सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. ही योजना राज्यभरातील दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठीसाठी पूरक ठरेल असा विश्वासही भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.