- कोकणातील भातउत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या
मुंबई, 30 ऑक्टोबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
गेल्या महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कोकणातील भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी आणि भातशेती टिकवून ठेवण्यासाठी शासनाने मदत करावी, असे साकडे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले आहे.
- सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु शासनाच्या नुकसान भरपाईच्या अटी आणि निकषांमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्याचा परिणाम कोकणातील भातपिकाचे क्षेत्र सातत्यान घटू लागले आहे. यंदा 63 हजार हेक्टर जमीन भातपिकाच्या लागवडीखाली येणे अपेक्षित होते. मात्र त्यात घट होवून ते 53 हजार 320 हेक्टरवर आले आहे. याचा परिणाम भाताचे उत्पादन घटण्याची भिती राणे यांनी व्यक्त केली आहे.
- ज्या ठिकाणी एकाच दिवशी 65 मि.मि. इतका पाऊस पडतो, त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना 16 हजार रुपयांची नुकसान देण्याबाबत केंद्र सरकारचा निकष आहे. मात्र सध्या कोकणात भातशेतीचे नुकसान करणारा पाऊस एकाच दिवशी 65 मि.मि. इतका न पडता दरदिवशी 25 ते 30 मि.मि. इतका पडत आहे. त्याचा परिणाम स्थानिक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या निकषानुसार आर्थिक नुकसानभरपाई मिळत नसल्याचे राणे यानी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे एकाच दिवशी 65 मि.मि. पावसाची अट शिथिल करून तीन दिवसांतील एकूण पावसाची टक्केवारी 65 मि.मि. पेक्षा अधिक झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू शकेल, असेही राणे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.