- ओडिशा राज्यात घेवून गेलेल्या तरुणाला अटक
नवी मुंबई, 30 ऑक्टोबर 2017/ Avirat Vaatchal News Bureau:
नवी मुंबईतील कामोठे येथे राहणा-या एका 17 वर्षीय मुलीची नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने ओडिशा राज्यातून सुटका केली आहे. लग्नाच्या अमिषाने पळवून नेलेल्या या मुलीसाठी तब्बल 8 महिने शोध मोहीम राबविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कामोठे पोलीस ठाण्यात 22 जानेवारी 2017 मध्ये एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. याप्रकरणी प्रारंभी कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे या प्रकरणाचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाकडे सोपविण्यात आला होता.
तपासादरम्यान कामोठे येथे राहणा-या आणि मूळचा ओडिशा राज्यातील झाडाससिमुडीया येथील असणा-या 23 वर्षीय खोगेंद्र नारायण बेज याने लग्नाचे अमिष दाखवून या मुलीले अपहरण केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. मात्र त्याच्या नातेवाईकांकडूनही याबाबत कोणतीच माहिती मिळू शकली नाही.
काही दिवसांनी आरोपी खोगेंद्र याने या मुलीला बरबरिया गाव जिल्हा बालेश्वर, ओडिशा येथे घेऊन गेल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी तबब्ल सात दिवस या मुलीचा शोध घेतल्यानंतर अखेर ती एका भाड्याच्या घरात आढळून आली. परंतु त्यावेळी आरोपी खोगेंद्र पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने प्रथम मुलीला नवी मुंबईत परतत आणले. त्याचवेळी आरोपी युवक खोगेंद्र सीबीडी रेल्वे परिसरातील पार्किंग मध्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सीबीडी रेल्वे परिसरात सापळा लावून रविवारी (29 ऑक्टोबर 2017रोजी) त्याला ताब्यात घेतले.
- गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तुषार दोषी, सहायक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण, सहा पोलीस निरीक्षक सुनीता भोर, पोलीस हवालदार शशीकांत पाटील, पोलीस नाईक विकास जाधव आदींच्या पथकाने या प्रकरणाची उकल केली.