- महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयांची सुविधा उपलब्ध होणार
- नवी मुंबई महानगरपालिकेने बजावली सूचना फलक लावण्यासाठी नोटीस
नवी मुंबई, 26 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पेट्रोलियम मंत्रालय, भारत सरकार यांचे आदेशान्वये सर्व पेट्रोल पंप व्यवसायिकांनी पेट्रोल पंपाच्या आवारात नागरिकांकरीता शौचालय व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. त्यामुळे जागोजागी असलेल्या पेट्रोल पंपांच्या आवारात आता महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र शौचालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे. public toilets on petrol pumpत्
त्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी बाबी मंत्रालय यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध होण्याकरिता सर्व पेट्रोल पंपांवरील शौचालयांना सार्वजनिक शौचालये म्हणून घोषित करण्यात आले आहे.
यापार्श्वभूमीवर आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या परवाना विभागामार्फत नवी मुंबई शहरातील सर्व पेट्रोल पंप व्यवसायिकांना पेट्रोल पंपाच्या आवारात असलेल्या शौचालयांना सार्वजनिक शौचालय म्हणून घोषित करणे तसेच पेट्रोल पंपाच्या दर्शनी भागात शौचालय असल्याबाबतचे दिशा दर्शक फलक लावणे तसेच शौचालय वापराबाबतच्या सूचना फलक (Signages) लावण्यासाठी नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.