नवी मुंबई विमानतळाचे काम मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसला

  • राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंपनीच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई, 24 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सर्वाधिक बोली लावणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे विमानतळाच्या कामाला आता गती मिळणार असून डिसेंबर 2019 पर्यंत विमानतळ सुरु होणे अपेक्षित आहे.

नवी मुंबई येथे 1160 हेक्टर क्षेत्रावर सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वाने (पीपीपी) ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक पद्धतीने बोली प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेमध्ये जीएमआर एअरपोर्ट्स, व्हॉल्युप्टास डेव्हलपर्स (हिरानंदानी ग्रुप) व झुरीच एअरपोर्ट इंटरनॅशनल एजी (व्यापारी संघ), एमआयए इन्फ्रास्टक्चर (व्हिन्सी एअरपोर्ट व टाटा रिअल्टी यांचा समन्याय सहभाग असलेली कंपनी) आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट यांनी सहभाग घेतला होता.

 

ठळक मुद्दे

  • सुरक्षा बाबींची पूर्तता करणाऱ्या आणि प्रकल्पाच्या 6 टक्के महसुलाचा समभाग सिडकोला देणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीची निवड करण्यात आल्याने सिडकोला एकूण वार्षिक उत्पन्नाच्या 12.6 टक्के महसुली समभाग आणि 26 टक्के प्राधिकरण समभाग मिळणार आहेत.
  • सवलतधारक शुल्कापोटी 5 हजार कोटी आणि पूर्व कार्यान्वयन शुल्क म्हणून 110 कोटी रुपये देखील सिडकोला प्राप्त होणार आहेत.
  • सवलतीच्या कर्जाची परतफेड करताना विकासकाच्या नेमणुकीच्या दिनांकापासून 11 वर्षानंतर पूर्वविकास कामांपोटी 3 हजार 420 कोटी रुपये सिडकोला विकासकाकडून दिले जाणार आहेत.
  • राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.