- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती, 23 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:
अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्र स्थापन करण्याच्या मागणी संदर्भात गांभिर्याने विचार करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
येथील ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
अमरावतीला इर्विन, डफरीन, सुपरस्पेशालिटी व टि.बी हॉस्पीटल अशी चार शासकीय हॉस्पीटल आहेत. या चारही हॉस्पीटलमध्ये 500 पेक्षा जास्त खाटा उपलब्ध आहेत. मेळघाटातील कुपोषण, शेतकरी आत्महत्या तसेच जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता अमरावती येथे शासकीय महाविद्यालय स्थापन होणे आवश्यक आहे. अमरावती शहरापासून6-7 कि.मी. अंतरावर केंद्रीय विद्यापीठासाठी शासनाची जमीन उपलब्ध आहे. त्यातील 100 एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्राला देता येईल. महाविद्यालयाच्या स्थापनेतून जिल्ह्यातील गोर-गरीब रुग्णांची सेवा होईल. ग्रामीण व शहरी भागातून याबाबत मागणी असून सुमारे 100-150 संघटनांनी यासाठी पांठीबा दिला असल्याची माहिती कृती समितीचे संयोजन किरण पातुरकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.