शुक्रवारपासून कोसळणाऱ्या पावसाचा परिणाम
नवी मुंबई, 7 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:
लोडशेडींगमुळे त्रस्त झालेल्या जनतेला काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. काल (शुक्रवार) दुपारपासून अधून मधून कोसळू लागलेल्या पावसामुळे ऑक्टोबर हीटचा प्रकोप काहीसा ओसरल्यामुळे विजेची मागणी घटली आहे. आज 16 हजार 500 मेगावॅट इतकी वीजेची मागणी आढळून आली आहे. मात्र आज 15 हजार 700 मेगावॅट इतकीच वीज उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोडशेडींग कायम ठेवण्यात आले आहे.
आठवड्याच्या सुरुवातीपासूनच ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागला आहे. प्रचंड उकाड्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्याचा परिणाम महावितरणचे वेळापत्रकच कोलमडले आणि राज्यभरात सक्तीचे लोडशेडींग सुरू झाले आहे. दिवसाला 17 हजार 800 मेगावॅट इतक्या विजेची मागणी वाढली होती. मात्र त्यातुलनेत वीज पुरवठा होत नसल्यामुळे ग्रामीण भागासह अ आणि ब गटात मोडणाऱ्या मुंबई उपनगरे, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांनाही लोडशेडींगचा फटका बसला. परंतु आजपासून अ आणि ब गटातील मोठ्या शहरांमधील लोडशेडींग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी राज्यातील ज्या भागात सर्वाधिक वीज हानी आहे अशा ई, एफ व जी-1, जी-2 आणि जी-3 गटातील फिडर्सवर तात्पुरते भारनियमन करण्यात आले असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
दरम्यान, कालपासून अधून मधून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम विजेची मागणी अचानक घटली आहे. तसेच हा पाऊस असाच पडू लागला तर पुढील काही दिवसांत राज्यातील ग्रामीण भागातील लोडशेडींगही कमी होईल, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
- महावितरणने अल्पकालीन कराराद्वारे 790 (700) मेगावॅट इतकी वीज खरेदी केली आहे.
- कृषीग्राहकांच्या वाहिन्यांवरील रात्रीची वीज उपलब्धता 17 सप्टेंबरपासून 10 तासांवरून 8 तासांवर आणली गेली आहे.