शेतकऱ्यांनी स्वतःच्या आणि कृषिमालाच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे आवाहन
मुंबई, 3 ऑक्टोबर 2017/ AV News Bureau:
राज्याच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागात ५ ते१४ ऑक्टोबर दरम्यान विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या काळात शेतकऱ्यांनी जीवितास तसेच कापणी केलेल्या अथवा कापणीयोग्य मालाच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केले.
अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या शेतमालास फटका बसू शकतो. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमालाची सुरक्षितरित्या साठवणूक करावी. कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आणलेला शेतमाल व्यवस्थित झाकून ठेवावा. तसेच या काळात विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळण्याच्या दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी बांधवांनी स्वतःच्या आणि जनावरांच्या जीविताच्या रक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, वीजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरच्या जवळ थांबू नये.