एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनच्या पुलावर चेंगराचेंगरी,22 ठार

मुंबई, 29 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

मुंबईत आज सकाळी साडे दहाच्या सुमारास एक भयानक दुर्घटना घडली. मध्य रेल्वेचे परळ आणि पश्चिम रेल्वेचे एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन्सना जोडणाऱ्या अरुंद पुलावर प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी होवून सुमारे 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 35 जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये 18 पुरूष आणि 4 महिलांचा समावेश आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत ही दुर्घटना घडल्यमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली. दरम्यान जखमींना तातडीने केईएमसह जवळच्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आज सकाळी मुंबईत पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक प्रवासी अरुंद पुलावर थांबले होते. लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पूल कोसळणार असल्याची अफवा पसरली. तसेच लोकल पकडण्यासाठीही प्रवाशांनी पूलावरून एकाच वेळी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, रेल्वे पोलीस, वैद्यकीय मदत तातडीने घटनास्थळी दाखल झाली.  केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली.

याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत तर जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.


बुलेट ट्रेन नको आधी लोकल सेवा सुधारा

मुंबईतील लोकलचा प्रवास जीवघेणा होत चालला आहे. वाढत्या गर्दीमुळे गाड्यांमध्ये शिरणेदेखील कठीण झाले आहे. आजच्या दुर्घटनेमुळे ही बाब स्पष्ट झाली आहे.  त्यामुळे आधी लोकल सेवा सुधारा मगच बुलेट ट्रेनचा विचार करा, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करू लागले आहेत.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तर धनंजय मुंडे यांनीही सरकारवर टीका केली.