- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नागपूर, 22 सप्टेंबर 2017/AV News Bureau:president ramnath kovind at dikshaboomi
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या दौऱ्याची सुरूवात आज दीक्षाभूमीला भेट देऊन केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि समाजक्रांतीचा पाया या पावनभूमीवर रचला. यामुळे भारतीय तथा संपूर्ण मानव समाज प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर होवू शकला. ही पवित्र दीक्षाभूमी संपूर्ण जगाला त्याग, शांती आणि मानवतेकडे जाण्यास प्रेरित करीत आहे. मला या ठिकाणी येवून खूप आनंद वाटला.” अशा आशयाचा अभिप्राय त्यांनी यावेळी नोंदविला. president ramnath kovind at dikshaboomi
यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, आमदार प्रकाश गजभिये, स्मारक समितीचे अध्यक्ष सदानंद फुलझेले, भंते सुरई ससाई उपस्थित होते.
राष्ट्रपतींनी दीक्षाभूमीवर भगवान गौतम बुद्ध यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी बुद्ध वंदनेमध्ये सहभाग घेतला. स्मारक समितीचे अध्यक्ष व सचिवांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला. यावेळी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘बुद्धा ॲण्ड हीज धम्म’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. दीक्षाभूमी परिसरातील बोधीवृक्षास राष्ट्रपतींनी भेट देवून अभिवादन केले.
ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी विपश्यना परिसरातील कोनशिलेचे अनावरण केले.
राष्ट्रपतींनी यावेळी विपश्यना सेन्टरमधील बुद्ध मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर पाच मिनिटे ध्यानधारणा केली.
विपश्यना मेडिटेशन सेंटरची वैशिष्ट्ये
- कामठी येथील दादासाहेब कुंभारे परिसरात सुमारे 10 एकर परिसरात विपश्यना मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे.
- या सेंटरमध्ये 83 फुट उंचीचा आकर्षक असा मुख्य पॅगोडा बांधण्यात आला आहे.
- पॅगोडाच्या चारही बाजूला दहा फुट उंचीचे चार पॅगोडा तयार करण्यात आले आहे. ओगावा सोसायटी तर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात मेडिटेशन सेंटर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने बांधण्यात आले आहे.
राज्य शासनाने विपश्यना केंद्राच्या संकल्पनेची दखल घेऊन विपश्यना सेंटरसाठी अर्थसहाय उपलब्ध करुन दिले आहे.
- विपश्यना मेडिटेशनमध्ये ध्यान साधनेकरीता दोन सभागृह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यात तळमजल्यावर चोवीस कक्ष बांधण्यात आले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या माळयावर तीन हजार चौरस फुट क्षेत्रफळाच्या वर्तुळाकार धम्म सभागृह बांधण्यात आले आहे.
- येथे 125 साधक एकाच वेळेस सामुहिक धम्म साधना करु शकतील.
- या ठिकाणी येणाऱ्या साधकांच्या निवासस्थानासाठी 2400 चौ. फुट क्षेत्रफळामध्ये स्वतंत्र आणि सामुहिक निवासव्यवस्था करण्यात आली आहे.
- भोजन व्यवस्थेकरीता महिला आणि पुरुषांकरीता स्वतंत्र दोन कक्ष बांधण्यात आले आहेत.
- सेंटरच्या सौंदर्यीकरणासाठी संपूर्ण भागात लॉन आणि बगीचा तयार करण्यात येणार आहे.