ठाणे महापालिकेत कंत्राटदारांच्या वावरावर मर्यादा

  • ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

 ठाणे, 20 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

पाच(दोन)(दोन) अंतर्गत एकही प्रकरण न करता निविदेशिवाय कुठलेही काम न करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच महापालिका कंत्राटदारांच्या पालिकेतील वावरावरही प्रतिबंध घालण्याचे निर्देश आयुक्तांनी दिल्यामुळे कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.

निविदा कामाची सद्यस्थिती महापालिकेच्या संकेतस्थळावर देण्याबरोबरच देयके यापुढे विभागाकडे सादर न करता नागरी सुविधा केंद्रात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे आदेशही त्यांनी अधिका-यांना दिले.

या संदर्भात महापालिका आयुक्तांनी मंगळवारी सायंकाळी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेवून सर्व अधिका-यांना सूचना दिल्या.

ज्या कामाची निविदा काढली जाते त्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा विस्तार करणे अपेक्षित असेल तर करारातील अटी आणि शर्थीप्रमाणे तो 10 टक्केपेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावी. तसेच यापुढे कोणतीही निविदा ही अंदाजित खर्चापेक्षा जास्त असणार नाही. आणि जास्त असल्यास ती 5 पाच टक्केपेक्षा जास्त जाणार नाही याची दक्षता घेतानाच ती अंदाजित खर्चापेक्षा जास्त का होते याची कारणमीमांसा स्पष्ट करून त्यास महापालिका आयुक्तांची मान्यता घ्यावी असे जयस्वाल यांनी सांगितले.

  • कंत्राटदारांच्या वावरावर मर्यादा

कार्यादेश घेण्यासाठी यापुढे कंत्राटदारास महापालिकेस येण्याची आवश्यकता नसून त्यांना त्यांच्या इमेलवर कार्यादेश पाठविण्यात यावा असे स्पष्ट करून यापुढे निविदा पूर्व बैठक, निविदा उघडणे, कागदपत्रे तपासणी आणि करारावर स्वाक्षरी करणे याशिवाय ठेकेदारांना महापालिका भवनामध्ये प्रवेश देण्यात येवू नये असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी सर्व अधिकारी आणि सुरक्षा विभागाला दिले.

  • भेटण्याची वेळ दुपारी 3 ते 6

शहर विकास विभागाच्या अनुषंगानेही जयस्वाल यांनी दुपारी 3 ते 6 यावेळेतच वास्तुविशारद आणि विकासकांना प्रवेश द्यावा. त्या व्यतिरिक्त त्यांना प्रवेश देण्यात येवू नये अशा कडक सूचना जयस्वाल यांनी सहा. संचालक, शहर विकास विभाग यांना दिल्या आहेत.