- सुट्टीच्या दिवशी केवळ ऑनलाईन बुकींग करणा-या पर्यटकांनाच प्रवेश
मुंबई, 18सप्टेंबर 2017/AV News Bureau:
जागतिक वारसा असलेल्या कास पठारावर आता फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातूनच नव्हे तर देशभरातून पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. सुट्टीच्या दिवशी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन शनिवार, रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी फक्त ऑनलाईन बुकींग करणाऱ्या पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच या दिवशी केवळ 3 हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे कासच्या पठाराला भेट देणार असाल तर ऑनलाईन बुकींग नक्की करा.
- सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर असणा-्या या पठारावर फुलांचा हंगाम सुरु झाला असून प्रत्यक्ष भेटीसाठी पुष्पपठार खुले आहे. पुष्पप्रेमींसाठी ऑनलाईन बुकींग सुरु करण्यात आले आहे. वाहनांसाठी पार्किंगची सुविधा मोफत देण्यात आली आहे. पार्किंगच्या ठिकाणापासून पुष्पपठारावर जाण्यायेण्यासाठी एस टी बस ची सुविधा करण्यात आली आहे. त्यासाठी नाममात्र तिकिट आकारले जाईल.
कास पठार च्या संकेतस्थळावर हे बुकींग करता येणार असून सकाळी 7 ते 10, 10 ते1, दुपारी 4 ते 7 अशा चार टप्यात बुकींग होणार आहे. प्रत्येक टप्यात 750 पर्यटकांची नोंदणी करण्यात येणार आहे.
कास पुष्प पठारावर पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या सुमारे 850 पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये औषधी वनस्पतींचा अधिक समावेश आहे. तसेच किटक व विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या 32 प्रजाती आढळतात. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 19 प्रजाती, सस्तन प्राण्याच्या 10 प्रजाती आणि पक्षांच्या 30 प्रजाती येथे आढळून येतात. कास पठार व परिसरात प्रदेशनिष्ठ, दुर्मिळ व अतिदुर्मिळ वनस्पती आहेत. रेड डाटा बुकमध्ये नोंद असणा-या जवळपास 40 फुलांच्या प्रजाती कास पठारावर आढळतात
कास पठार हे वर्ड हेरिटेज कमिटीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील 39 ठिकाणापैकी एक आहे. 21 देशांच्या सभासदासमोर पश्चिम घाटाला जागतीक वारसा स्थळाचे नामांकन मिळाले आहे. त्यातील कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे.