मराठवाड्याच्या विकासाला अग्रक्रम

  • मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद,17 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्याचा राज्य सरकारचा निर्धार असून त्यासाठी शेती, उद्योग आणि पायाभूत क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आज येथे सिध्दार्थ उद्यानात मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केल्या नंतर  ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

अन्न  सुरक्षेच्या माध्यमातून 40 लाख कुटूंब पात्र ठरली आहेत. पंतप्रधान पीक विमा योजना  2017-18 अंतर्गत राज्‍यात एकूण 62.36 लाख शेतक-यांनी सहभाग घेतला असून त्‍यापैकी  53 लाख  शेतकरी मराठवाडयातील आहेत. राज्‍यातील एकूण शेतकरी  संख्‍येच्‍या तुलनेत हे प्रमाण 80टक्‍के  इतके आहे. याही वर्षी पीक विमा योजनेत मराठवाडा अग्रेसर राहिला आहे. मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेचे कौतूकास्पद काम झाले असून या योजनेमुळे साडेचार लाख हेक्टर एवढ्या क्षेत्राला पाणी मिळाले आहे. यामुळे पूर्वी फक्त खरीपाचे पीकं काढणारे शेतकरी रब्बीचेदेखील पीक घेऊ लागले आहेत.  मराठवाड्यातील धरणांच्या कामांना चालना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वॉटर ग्रिड प्रकल्पाचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. या वॉटर ग्रिडमुळे मराठवाड्यातील उद्योग तसेच शेतीला वरदान मिळणार आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कृष्णा खोऱ्यातून मिळण्यासाठी शासनाने मान्यता दिली. केंद्र शासनाच्या माध्यमातून दमणगंगा प्रकल्पाचे 50 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी तत्वत: मान्यता मिळाली असल्याचंही त्यांनी सांगितले.

उद्योग क्षेत्राचा उल्लेख करुन डीएमआयसी प्रकल्पा अंतर्गत अकरा हजार कोटींचा प्रकल्प औरंगाबाद येथे ऑरीक सिटी या नावाने असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामुळे 3 लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले. औरंगाबाद सारख्या ऐतिहासिक शहरातील रस्त्यांसाठी  शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.