देशातील पहिले वृक्ष लागवड संमेलन १७ सप्टेंबरला
मुंबई, 15 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
देशातील पहिले वृक्ष लागवड संमेलन 17 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात होणार असून असून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे होईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
या संमेलनाच्या माध्यमातून राज्य शासनाने हाती घेतलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिम, नदी स्वच्छता व नद्यांचे पुनरुज्जीवन या कार्यक्रमांसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ईशा फाऊंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आदि उपस्थित राहणार आहेत.
वृक्ष लागवड आणि नदी स्वच्छता आणि नदी पुनरुज्जीवनाचा विचार लोकांसमोर मांडला, त्यासंबंधीचे आवाहन केले तर हे दोन्ही कार्यक्रम वेगाने पुढे जाण्यास मदत होणार आहे. ईशा फाऊंडेशनने “रॅली फॉर रिव्हर” हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातही या दोन विषयावर लोकचळवळ निर्माण केली जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘रॅली फॉर रिव्हर’ या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील नद्यांच्या दोन्ही काठावर फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहभागातून वृक्ष लागवडीचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात या दोन्ही कार्यक्रमांना गती देण्यासाठी व्यापक लोकचळवळ निर्माण करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून राजभवन येथे हा “वृक्ष लागवड संमेलन” चा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे वनमंत्र्यांनी यावेळी सांगितले