प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई, 14 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. हा कार्यक्रम म्हणजे निवडणुकांना प्रभावित करण्याचा कार्यक्रम आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात बोलत होते.
बुलेट ट्रेनचे डिजाईन अद्याप फायनल झालेले नाही, जमीन संपदित करण्यासाठी काही हालाचाली झालेल्या नाही. दर दिवशी रेल्वेचे अपघात घडत आहेत. केंद्र सरकारने आधी भारतीय रेल्वेला पटरीवर आणावे मग देशात बुलेट ट्रेन आणण्याच्या वलग्ना कराव्यात असा खोचक टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला. या आधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बनारसचा विकास करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी दाखवले होते. जपान सरकारसोबत भारत सरकारचे करारही झाले होते मात्र अद्यापही बनारसचा विकास झालेला नाही असे ते म्हणाले.
विद्यार्थी संघाच्या विचाराला नाकारत आहेत
असाम, पंजाब, दिल्ली विद्यापीठ आणि जेएनयूमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दारूण पराभव मिळाला. विद्यार्थी संघाच्या विचारांना नाकारत असल्याचे यातून समोर आलं आहे. या विद्यापीठांमध्ये लागलेल्या निकालांचा येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये नक्कीच प्रभाव दिसेल आणि विद्यार्थ्यांप्रमाणेच देशातील जनता ही संघाच्या विचारांना नाकारेल असे मत त्यांनी व्यक्त केले.