501 अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करणार

नवी मुंबई, 12 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे. तब्बल 501 अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होणार असून त्यामध्ये सिडकोच्या जागेवर तब्बल 377 अनधिकृत धार्मिक स्थळांचा समावेश आहे. नवी मुंबई महापालिका आणि इतर संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत न्यायालयाच्या तसेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबतचा निर्णय घेण्यात आला.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृ धार्मिक स्थळांची माहिती

  • महापालिकेच्या जागेवर 14
  • सिडकोच्या जागेवर 377
  • एम.आय.डी.सी.च्या जागेवर 100
  • वन विभागाच्या जागेवर 07
  • वन विभागाचे (कांदळवन कक्ष) 01
  • रेल्वेच्या जागेवरील 02

 

  • शासनाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यानुसार सर्व प्राधिकरणांना निष्कासन कार्यवाहीचा आराखडा सादर करण्यासाठी सूचित करण्यात आले होते.
  • सिडकोच्या जागेवरील नव्याने केलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आलेल्या 65 धार्मिक स्थळांवर 1 महिन्याच्या कालावधीत हरकती / सूचना मागविण्याबाबत यावेळी विचारविनीमय करण्यात आला. तसेच सिडकोकडील 312 व एम.आय.डी.सी. कडील 100 अनधिकृत धार्मिक स्थळांवर पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले.
  • शासकीय कार्यालये / पोलीस स्टेशन मधील अनधिकृत धार्मिक स्थळांवर महानगरपालिका विभाग कार्यालयांकडील यंत्रसामुग्री घेऊन निष्कासन कारवाई करण्यात येणार आहे.
  • न्यायालयाचे व शासनाचे आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवर विहित मुदतीत कार्यवाही न केल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील असे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.