- मुख्य निवडणूक अधिकारी
मुंबई, 12 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
मतदार यादी तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ERO-Net ही नवीन संगणक प्रणाली विकसित केली आहे. यापुढे या प्रणालीच्या आधारेच मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदार नोंदणीच्या अनुषंगाने आपले अर्ज प्राधान्याने ऑनलाईन करावेत, असे आवाहन राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.
- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम दरवर्षी करण्यात येत असते. ही मतदार यादी संगणकीय प्रणालीच्या आधारे तयार करण्यात येत असते. सध्या ही यादी ERMS (Electorol Roll Management System) या संगणक प्रणालीच्या आधारे तयार केली जात आहे. तथापि आता भारत निवडणूक आयोगाने ERO-Net या नावाची नवीन संगणक प्रणाली विकसित केली असून यापुढे ERO-Net या प्रणालीच्या आधारेच मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. तसेच आता ERO-Net ही प्रणाली देशभर समान पद्धतीने हाताळण्यात येणार आहे.
- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यात ERO-Net ही संगणक प्रणाली सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे. NVSP वर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेले सर्व नवीन अर्ज ERO-Net प्रणालीवर हाताळण्यात यावे, अशा सूचना सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. तरी नागरिकांनी यापुढे आपले अर्ज करण्यासाठी nvsp.in या संकेतस्थळाचा प्राधान्याने वापर करावा, असेही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी कळविले आहे.