पुस्तकांच्या गावात ‘स्मरण विंदांचे’

मुंबई 8सप्टेंबर 2017/AV News Bureau:

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून पुस्तकांच्या गावात (भिलार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) ‘स्मरण विंदांचे’ हा कार्यक्रम १६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.

‘भारतातील पहिलं पुस्तकांचं गाव’ म्हणून संपूर्ण देशाने गौरवलेल्या या अभिनव प्रकल्पात आता साहित्यिक जाणिवा समृद्ध करणाऱ्या कार्यक्रमांची सुरुवात होत आहे. सन २०१७-१८ हे वर्ष कविवर्य विंदा करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.  या निमित्ताने, मराठी साहित्याचा मानबिंदू असलेल्या विंदांना अभिवादन करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांच्या गावी ‘स्मरण विंदांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.परिसंवाद, कविसंमेलन व अभिवाचन असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत ४ सत्रांत हा कार्यक्रम होणार आहे.

 

डॉ. अरुणा ढेरे, अभिराम भडकमकर, प्रदीप निफाडकर, ऐश्वर्य पाटेकर, डॉ. अविनाश सप्रे, श्रीधर नांदेडकर, सौरभ गोखले, संगीता बर्वे, प्रमिती नरके आदी साहित्यिक, कलाकार व अभ्यासक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच कविवर्य विंदा करंदीकरांच्या परिवारातील जयश्री काळे, आनंद करंदीकर आदी उपस्थित राहणार आहेत.

‘स्मरण विंदांचे’ या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि पुस्तकांच्या गावाचा अनुभव घेण्यासाठी वाचक-रसिकांनी १६ सप्टेंबर रोजी पुस्तकांच्या गावाला (भिलारला) आवर्जून भेट द्यावी. तसेच इच्छूक सहभागींनी pustakanchgaav.rmvs@gmail.com  या ई-पत्त्यावर आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन तावडे यांनी केले आहे.