मुंबई, 31 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील हुसैनी ही पाच मजली इमारत कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर इतर 14 जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगा-याखालून 30 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही काही रहिवाशी ढिगा-याखाली अडकले असण्याची भिती असून बचावकार्य सुरू आहे. बचाव कार्यादरम्यान अग्निशमन दलाचे 5 जवान आणि एनडीआरएफाचा 1 जवान जखमी झाले असून त्यांच्यावर जे.जे. रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जे.जे रूग्णालयाजवळील पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनी ही जुनी बिल्डिंग होती. भेंडीबाजार या नावाने ओळखला जाणा-या या भागात अनेक जुन्या इमारती आहेत. तळमजला आणि पाच मजले असलेल्या या इमारतीत 12 खोल्या आणि 6 गोदाम होते. या इमारतीत 9 कुटुंबे राहात होती. आज सकाळी साडे आठच्या सुमारास इमारत कोसळली. याबाबत पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती मिळताच दहा अग्निशमन बंब, रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या . अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) 45 सदस्यीय पथक अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचाव कार्यात कार्यरत आहे. जवळपास 30 ते 35 रहिवाशी या इमारतीत राहात होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना या इमारत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनाही याबाबत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मदत व पुर्नविकास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रूपयांची मदत जाहिर केली आहे.