2 लाखांपेक्षा अधिक अनधिकृत फेरीवाल्यांचा मुंबईला विळखा
ठोस कारवाई करण्यास प्रशासन अपयशी, मुंबई स्पशेल पथकाचे कामही ठप्प
मुंबई, 28 ऑगस्ट 2017:
मुंबई शहरात रस्तोरस्ती फेरीवाले दिसतात, पण परवानाधारक फेरीवाल्यांची संख्या केवळ 11 हजार 573 इतकी आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत तब्बल सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक फेरीवाले अनधिकृत असल्याची माहिती महापालिकेच्या परवाना विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईमधून समोर आली आहे.
मुंबई महापालिकेच्या 24 विभागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात सातत्याने कारवाई केली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासन करते. मात्र विभागस्तरावर होणारी कारवाई ठोस नसल्यामुळे फेरीवाले तात्पुरते गायब होतात. कारवाई थंडावली की पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान रस्ते आणि पदपथांवर बसते. अनधिकृत फेरीवाल्यांबाबत ठोस धोरण नाही. तसेच केवळ विभाग पातळीवरच अशा फेरीवाल्यांविरोधात जुजबी कारवाई केली जात आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिक जटील झाला असून त्याचा त्रास सर्वसामान्य मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.licensed feriwala in mumbai
- मुंबई महापालिका प्रशासनातर्फे एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत मुंबईच्या सर्व विभागांमध्ये केलेल्या कारवाईचा तपशिल पुढीलप्रमाणे (अनुज्ञापन विभागातर्फे प्राप्त माहितीनुसार) (licensed feriwala in mumbai)–
महापालिका प्रशासन दर महिन्याला अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात केलेल्या कारवाईचा लेखाजोखा मांडते. जुलै महिन्यात 24 हजार 894 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केल्याची माहिती अनुज्ञापन विभागातर्फे देण्यात आली. मात्र अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्यामुळे पुन: रस्त्यावर दिसू लागतात. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांची या त्रासातून सुटका होताना दिसत नाही. महापालिका प्रशासनाकडून केलेल्या जाणाऱ्या ढिसाळ कारवाईमुळेच परवानाधारक आणि बिगर परवानाधारक फेरीवाल्यांमधील तफावत दिवसेंदिवस वाढत असून त्यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तर मुंबई शहर बकाल होण्यास अधिक वेळ लागणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया मुंबईकरांकडून व्यक्त केली जात आहे.
- अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणाऱ्या दक्षता पथकाचे काम ठप्प (licensed feriwala in mumbai)
मुंबई महापालिकेच्या 24 विभागांमध्ये बेकायदेशीर फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यासाठी अनुज्ञापन अधिक्षक मुख्य कार्यालय यांच्या अखत्यारित मुख्य कार्यालय दक्षता पथक स्थापन करण्यात आले. ‘मुंबई स्पेशल’ या नावाने ओळखला जाणारा आणि गेल्या 3 दशकांपासून कार्यरत असणाऱ्या या विभागाचे काम गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडले आहे. हे विशेष पथक 24 विभागांमध्ये कुठेही कारवाई करून जप्त केलेला माल एका विभागातून दुसऱ्या कोणत्याही विभागामध्ये स्थलांतरीत करते. त्यामुळे स्थानिक राजकारणी, फेरीवाल्यांच्या नेत्यांना दुसऱ्या विभागात जाऊन हस्तक्षेप करणे शक्य होत नसल्यामुळे हे पथक अनधिकृत फेरीवाल्यांसाठी डोकेदुखी ठरले होते. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात या पथकाची कामगिरी महत्वाची ठरते. मे महिन्यात ए विभागातील मुख्य कार्यालय दक्षता पथक (394) कडून फेरीवाल्यांबाबतचा अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आला होता. मात्र हा अहवाल फेरीवाल्यांना अनकूल असल्याचा ठपका ठेवत महापालिका प्रशासनाने मुख्य कार्यालय दक्षता पथकातील 2 निरीक्षक आणि ए विभागतल्या वरिष्ठ निरीक्षकाला निलंबित केले. मात्र त्याचवेळी मुंबई स्पेशल या पथकाचे कामही थांबवण्यात आले. मात्र मुंबई शहरात कुठेही कारवाई करणारे ‘मुंबई स्पेशल’ बंद का करण्यात आले याचे कारण गुलदस्त्यात आहे.
मुंबई शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाई सुरूच राहणार आहे. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणारे मुख्य कार्यालय दक्षता पथकाचे (मुंबई स्पेशल) कामकाज थांबविण्याचे तोंडी आदेश वरिष्ठांकडून मिळाले होते. त्यानुसार या पथकाचे काम थांबवले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अधिक पत्रव्यवहार सुरू आहे.
शरद बांडे,अनुज्ञापन अधिक्षक, अनुज्ञापन विभाग ,मुंबई महापालिका
उपायुक्तांचा भेटण्यास नकार
मुंबई महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न तसेच दक्षता पथकाचे काम ठप्प पडल्याविषयी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे (फेरीवाला नियमन) उपायुक्त रणजित ढाकणे यांच्याकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेटण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रश्नावर मुंबई महापालिका प्रशासनाची भूमिका अधिक स्पष्ट होवू शकली नाही.