रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचा राजीनामा

पंतप्रधान मोदींनी राजीनामा फेटाळला

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या दोन रेल्वे अपघातांची जबाबदारी स्विकारून केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना थांबायला सांगून राजीनामा फेटाळला. सुरेश प्रभू यांनी टि्वटरवरून  ही माहिती दिली आहे.

उत्तर प्रदेशमधील औरैया जवळ आजमगढहून दिल्लीला जाणा-या कैफियत एक्सप्रेसला आज पहाटे अपघात झाला. या अपघातात 74 प्रवासी जखमी झाले आहेत. मागील आठवड्यात मुजफ्फरनगर मध्ये उत्कल एक्सप्रेस रूळांवरून घसरून झालेल्या अपघातात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दोनही अपघातांनंतर नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा दिल्याचे प्रभू यांनी टि्वटरमध्ये म्हटले आहे.

या अपघातांमुळे मला खूप वेदना झाल्या असून प्रवाशी जखमी झाल्याने माला दुखः झाले आहे. रेल्वेला आधुनिक करण्यासाठी मी गेले तीन वर्ष माझे रक्त आटवले आहे असेही प्रभू यांनी टि्वटरमध्ये म्हटले आहे.

कैफियत एक्सप्रेसला अपघात

उत्तर प्रदेशमधील औरैया जवळ आजमगढहून दिल्लीला जाणा-या कैफियत एक्सप्रेसला बुधवारी पहाटे 2.50 च्या सुमारास हा अपघात झाला. मानव रहित फाटकात अडकलेल्या एका डंपरला धडक दिल्यामुळे एक्सप्रेसचे 12 डबे रूळावरून घसरले. या अपघातात 74 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 4 जणांनी प्रकृती चिंताजनक आहे. कानपूर आणि इटावा स्थानकांदरम्यान असणा-या फाटक क्रमांक 14 वर हा अपघात झाला.