1586 पैकी 295 मंडळांना परवानगी तर 1196 प्रतिक्षेत
मुंबई, 23 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
मुंबईसह सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. मात्र गणेशोत्व सुरू होण्यापूर्वीच काही मंडळांना धक्का बसला असून मुंबई महापालिकेने 21 ऑगस्टपर्यंत प्राप्त अर्जांपैकी 95 गणेश मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी नाकारली आहे. तर 1 हजार 196 मंडळांच्या मंडप उभारणीस परवानगी मिळाली नसून 1586 पैकी आतापर्यंत 295 मंडळांनाच मंडप उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
गणेशोत्सव जवळ येऊ लागला की, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची धावपळ सुरू होते. सर्वात आधी मंडप परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज करण्यापासून सुरुवात होते. मुंबई महापालिकेकडे 21 ऑगस्टपर्यंत सर्व 24 विभागांमधून 1 हजार 586 गणेश मंडळांनी मंडप उभारण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 295 मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर 95 जणांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. याशिवाय 1 हजार 196 जणांचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.
पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस आदींच्या परवानग्या मिळवण्यापासून धावपळ सुरू होते. मात्र अनेकदा अपुरी कागदपत्रे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणे, सुरक्षेच्या मुद्दा अशा अनेक गोष्टींमुळे या परवानग्या मिळणे बाकी असल्यामुळे महापालिकेकडून मंडप उभारणीबाबत परवानगी देण्याचे काम प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवी मुंबईत 116 मंडळांना परवानगी
- नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या 116 सार्वजनिक गणेश मंडळांना ऑगस्टपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिली.