उत्तर प्रदेशमध्ये एक्सप्रेसचे डबे घसरले,4ठार

मुजफ्फरनगर, 19 ऑगस्ट 2017:

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये कलिंग उत्कल एक्सप्रेसचे सुमारे 5 डबे घसरुन झालेल्या भिषण अपघातात 6 जण ठार झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात  4  ठार तर 50 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुझफ्फरनगरमधील खतौलीजवळ आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातामुळे दिल्ली ते सहारनपुर दरम्यानची रेल्वे वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. तसेच मेरठ आणि सहारनपुर मध्ये रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वेमार्गावरून घसरुन डबे एकमेकांमध्ये घुसल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. हरिद्वार –पुरीदरम्यान धावणाऱ्या या एक्सप्रेसच्या अपघातानंतर एनडीआरएफ तसेच एटीएसची पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत.

दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच रेल्वेमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी जाण्याचे आदेश देवून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले.