नितिश कुमारांकडून नरेंद्र मोदींचे नेतृत्व मान्य
शरद यादवांनी नितिश कुमारांविरोधात मोर्चेबांधणी
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2017:
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (JDU) ने आता एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत याबाबतच्या ठरावावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. चार वर्षांपूर्वी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून नितिश कुमार यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता नितिश कुमार यांनी मोदींच्या सोबतच जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहारच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याशी बिनसल्यानंतर अनेक घडामोडीनंतर नितिश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. मात्र भाजपच्या मदतीने पुन्हा सत्ता स्थापन करून नितिश कुमार मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नितिश कुमार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचे औपचारिक आमंत्रण दिले होते. जेडीयुच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत याबाबत चर्चा करून सर्वसंमतीने एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले.
नितिश कुमार यांच्या जेडीयुने एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी मंत्रीमंडळ विस्तारात जेडीयुच्या पदरात दोन मंत्रीपदे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शरद यादव यांच्याकडून तीव्र विरोध
जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत नितिश कुमार यांच्या निर्णयाविरोधातही वातावरण दिसून आले. या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी हजेरी लावली नाही. नितिश कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर शरद यादव आणि लालू प्रसाद यादव यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आपल्या नेतृत्वाखालील गट हा खरा संयुक्त जनता दल असल्याचा दावा शरद यादव यांनी केला आहे. त्यामुळे जेडीयूमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येते. आगामी काळात जेडीयूमधील राजकारण कसे वळण घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या –