ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश
ठाणे,17 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
ठाणे महापलिका हद्दीत विविध ठिकाणी रस्त्याची कामे करताना रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांच्या खोडाच्या भोवती काँक्रीटीकरण अथवा डांबरीकरण केल्यामुळे झाडांच्या खोडाला व मुळांना हवा (ऑक्सीजन) व पाणी याचा पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शहरातील वृक्षांच्या खोडाच्या सभोवताली केलेले काँक्रीटकरण तसेच डांबरीकरण तातडीने काढून टाका, असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.
यासंदर्भातील तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देत वृक्षांच्या सभोवती माती राहील, याची दक्षता घेण्याचे आदेशही आयुक्तांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर वृक्षांच्या खोडाच्या सभोवताली केलेले काँक्रीटकरण आणि डांबरीकरण काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु करण्यात आले आहे.
या कार्यवाही अंतर्गत नौपाडा प्रभाग समितीमध्ये 811 वृक्षांच्या भोवतालची, माजिवडा-मानपाडाप्रभाग समितीमधील 276, कोपरी प्रभाग समितीमधील 170 असे एकूण 1 हजार 257 रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांच्या सभोवतालचे काँक्रीट आणि डांबर काढून टाकण्यात आल्याचे ठाणे महापालिका प्रशासनाने कळवले आहे. दरम्यान वृक्षांच्या सभोवतीचे काँक्रीटकरण आणि डांबरीकरण काढण्याकचे काम यापुढेही सुरु ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या आहेत.