पांगरीच्या धरणातून राजापूरसाठी नळपाणी योजना

तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी देण्यासाठी ग्रॅव्हीटी तंत्रज्ञानाचा वापर करणार

मुंबई, 11 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

पांगरी येथील धरणातून ग्रॅव्हीटी तंत्रज्ञानाचा वापर करुन राजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे आमि त्याबाबतचा अहवाल येत्या 15 दिवसांत सादर करावा,असे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज संबंधित विभागांना दिले.

राजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार राजन साळवी यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री खोत यांना निवेदन दिले होते. त्यानुसार राज्यमंत्री खोत यांनी सर्व मंत्रालयीन व क्षेत्रीय अधिका-यांची बैठक घेतली .बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जलसंपदा विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

पंपिंगद्वारे  पाणी पुरवठा करण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्रधिकरण, जिल्हा परिषद, जलसंपदा विभागाने संयुक्त सर्वेक्षण करावे. माहिनाभरात याबाबतचा आराखडा तयार करून सादर करावा, असे निर्देश खोत यांनी दिले.आसपासच्या गावांना पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी टंचाई निधीतून निधी घेणे शक्य आहे, याबाबत 15 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचनाही खोत यांनी अधिकाऱ्यांना केल्या.