गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांच्या राजिनाम्यासाठी काँग्रेसचा मोर्चा
मुंबई, 5 ऑगस्ट 2017:
एसआरए घोटाळाप्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी त्वरित मंत्रीपदाचा राजीनामा देऊन खुर्ची रिकामी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानावर मुंबई काँग्रेसतर्फे आज मोर्चा काढण्यात आला.
आम्हाला प्रकाश मेहता यांच्या घरी मोर्चा काढून त्यांचा राजीनामा काढण्याची गरज का भासली? संपूर्ण महाराष्ट्र आज प्रकाश मेहता यांनी केलेल्या घोटाळ्यामुळे त्यांचा राजीनामा मागत आहे. पण ते राजीनामा द्यायला तयार नाहीत. ज्या जनतेने निवडून दिल्यावर आमदार झाले, नंतर गृहनिर्माण मंत्री होऊ शकले, त्या जनतेची प्रकाश मेहता यांनी घोर फसवणूक केली आहे. एसआरएच्या माध्यमातून लोकांच्या घरांचा विकास करणे हे त्यांचे काम असताना ते गरिबांना फसवून घोटाळ्यांवर घोटाळे करत आहेत. आम्ही आजचा मोर्चा भाजपाचा भ्रष्टाचार जनतेसमोर उघड करण्यासाठी काढला आहे. आम्ही प्रकाश मेहता यांचा राजीमाना आणला आहे. त्यांना फक्त राजीनाम्यावर हस्ताक्षर करायचे आहेत,असे निरुपम म्हणाले.