मुंबई,4 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
यंदाच्या रक्षाबंधन सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी ७ व ८ ऑगस्ट रोजी एसटीने आगार निहाय स्थानिक पातळीवर अधिक बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये भाऊ- बहिणीच्या भावनिक नात्याचा सण म्हणून “रक्षाबंधन” सणाला खूप महत्व आहे. या दिवशी भाऊ बहिणीकडे अथवा बहीण भावाकडे ओवाळण्यास जाते. साहजिकच या दिवशी प्रवाशी वाहतूकीची प्रचंड गर्दी होत असते. हे ओळखून एसटीने यावर्षी प्रत्येक आगारातून मार्गनिहाय जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी स्थानिक पातळीवर प्रवाशी गर्दी बघून एसटी बसेस सोडल्या जात होत्या. यावर्षीपासून मध्यवर्ती कार्यालयाकडून विशेष परिपत्रक काढून मार्गदर्शक सूचना दिल्या असून संपूर्ण महाराष्ट्रात “रक्षाबंधन” सणाला एसटीच्या जादा वाहतूकीमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे एसटीला वर्षातील सर्वाधिक प्रवाशी या दिवशी प्राप्त होत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त सुरक्षित प्रवाशी वाहतूक करून चांगले उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट एसटी प्रशासनाने ठेवले आहे. त्याकरीता प्रमुख बसस्थानकावर प्रवाशांना मार्गदर्शनासाठी प्रवासी मित्र, रस्त्यावरील बस थांब्यावर जादा वाहतुकिची माहिती देण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.