मुंबई, 3 ऑगस्ट 2017/AV News Bureau :
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या वादग्रस्त ध्वनिफितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून हटविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
मोपलवार यांच्यावरील आरोपांबाबत फॉरेन्सिक चौकशीसह एका महिन्यात संपूर्ण चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले होते. मात्र आज सभागृह सुरू होताच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि मोपलवार यांना आपल्या पदावरून हटवावे अशी मागणी विरोधकांनी केली होती. यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला. सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.
मात्र मोपलवारांना पदावरून हटवू नका तर त्यांना निलंबित करा अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. प्रकाश मेहता यांनाही चौकशी होईपर्यंत मंत्रिपदावरून हटवावे अशी मागणी विरोधकांनी केली. दरम्यान विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.