नागाव पाल्हे पूल अवजड वाहनांसाठी बंद

बोर्ली मांडला, 2 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

अलिबाग तालुक्यातील तीन ते चार वर्षांपूर्वी बांधलेल्या अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कुरुळ रस्त्यावरील पुलासहित अन्य पुलाची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने कमकुवत झालेल्या नागाव पाल्हे पूलावर लोखंडी कमानी लावून अवजड वाहनांसाठी बंद केला आहे.

अलिबाग तालुक्यातील बेलकडे फाटा ते नागाव येथील रस्त्याचे काम सुरू असल्याने गेली सात ते आठ महीने  या रस्त्यावरील मोठ्या वाहनांची  वाहतूक ही बेलकडे ते नागाव दरम्यान बंद करून ती अलिबाग रोहा मार्गावर असणाऱ्या नागाव पाल्हे पूलावरून वळविण्यात आली होती. तर इतर अवजड वाहने ही वावे मार्गे वळविण्यात आली होती. मात्र काही वेळा माल घेऊन येणारी अवजड वाहने ही वावे मार्गे रेवदंडा न जाता या पुलावरून ये जा करीत होती. याप्रकरणी सार्वजनिक  बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले होते .

बांधकाम विभागाने पूल धोकादायक असून यावरून अवजड वाहनांची वाहतूक करू नये असे आदेश दिले असताना त्या आदेशाला केराची टोपली दाखवीत त्या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती.  या पूल तुटला तर दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला असता. त्यांना बेलकडे आक्षी मार्गे नागाव रेवदंडा येथे  यावे लागले असते.

नागाव येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरणवेळी या पुलावरून मोठ्या प्रमाणावर छोट्या वाहनासाहित अवजड वाहनांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे हा पुल पहिल्यापासून कमकुवत होता तो आता अधिकच कमकुवत झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहन चालक यांच्यासाहित नागरिकांकडून वाढत्या तक्रारीची दखल घेऊन या पुलावर दोन्ही बाजूस लोखंडी कमानी लावून अवजड वाहनांना बंदी घातली आहे.

दरम्यान, पूलाची तातडीने डागडुजी करावा अथवा नव्याने पूल उभारावा, जेणेकरून भविष्यात हा मार्ग सुरक्षित होईल, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.