मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, 2 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
ब्लु व्हेल गेममुळे मुंबईत एका मुलाचा मृत्यु झाला ही गंभीर बाब असून, हा इंटरनेटवर आधारित खेळ असल्याने केंद्र सरकारशी चर्चा करून याला थांबविण्यासाठीचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
मुंबईत ब्लू व्हेल गेममुळे एका मुलाचा झालेला मृत्यू याबाबत सदस्य अजित पवार यांनी काल विशेष प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.
अनेक देशांत या गेममुळे आत्महत्या झालेल्या आहेत. या गेममध्ये मुलांना गुंतवले जाते आणि एक साहस म्हणून त्यांना आत्महत्या करायला सांगितले जाते. हा प्रकार गंभीर असून, मुंबईतील घटनेची माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल. हा इंटरनेटवर असलेला गेम आहे. त्यामुळे केंद्राशी चर्चा करून हे थांबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.