मीरा भाईंदर, 2 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजप आणि रिपाईचे जागावाटप झाले आहे. भाजप 91 जागांवर तर रिपाइं 4 जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती आमदार नरेंद्र मेहता यांनी आज दिली.
महापालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षानेही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे सांगत किमान 70वरज जागांवर भाजप आघाडीला विजय मिळेल, असा विश्वासही मेहता यांनी व्यक्त केला. मीरारोड येथील सेव्हन स्क्वेअर आकादमीत आज पत्रकार परिषदेत मेहता यांनी जागा वाटप जाहीर केले.
भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रयत्नात आम्हाला रिपाइं व रा.स.प. या मित्रपक्षांची साथ लाभली आहे. भाजपने नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेतली आहे. सर्व समाज घटकांना सोबत घेत मित्र पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी समन्वय साधत प्रचार मोहीम राबवली जात असल्याचे मेहता यांनी यावेळी सांगितले.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या सत्तेतील वाटा देण्याचे वचन भाजपाच्या नेतृत्वाने आपल्या मित्र पक्षांना दिले होते. हे वचन आमच्या राज्यातील नेतृत्वाने पाळल्याने आमच्या कोणत्याही मित्र पक्षाची कुठलीच तक्रार नाही. त्यामुळेच मीरा भाईंदर महापालिकेतही या सर्व मित्र पक्षांकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे भाजप उमेदवारांची यादी जाहीर होण्यास विलंब झाला आहे. उमेदवार निवडीसाठी एक सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसारच सर्व ठिकाणी सक्षम आणि योग्य उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणालाही अगोदर आश्वासन देऊन, मग तिकीट नाकारले, अशी एकही तक्रार येणार नाही, असा विश्वासही मेहता यांनी व्यक्त केला.