नवी मुंबई, 2 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
ए.पी.एम.सी. भाजीपाला मार्केटमध्ये धडक कारवाई करून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या 1 हजार 955 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त शहर अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 1 चे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी एपीएमसीतील भाजीपाला मार्केट येथे राहुल गुप्ता यांच्या गाळा क्र. डी-647 आणि कमलेश गुप्ता यांच्या गाळा क्र. 452 येथे ही कारवाई केली.
नवी मुंबई शहरात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम संपूर्ण राबविण्यात येत आहे. प्लास्टिकचा साठा व विक्री करणा-या व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे तसेच नवी मुंबईकर नागरिकांनीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा व कागदी / कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.