- फॅशन स्ट्रीटवरील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईचे प्रकरण भोवले ?
- ठोस कारवाईअभावी मुंबई शहरात फोफावतेय अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या
मुंबई, 2 ऑगस्ट 2017:
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबई शहराला बेकायदेशीर फेरीवाल्यांचा विळखा बसला आहे. बेकायदेशीर फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे मुंबईच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्यातच बेकायदेशीर फेरीवाल्यांवर धडक कारवाई करणारा ‘मुंबई स्पेशल’ हा विशेष विभागही गेल्या काही दिवसांपासून अचानक बंद केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईतील 24 वॉर्डांमधील बेकायदेशीरपणे फोफावणाऱ्या फेरीवाल्यांना अटकाव कोण करणार आणि मुंबई स्पेशल विभाग बंद करण्यामागचे नेमके कारण काय, अशी चर्चा सुरू आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी यंत्रणा
- मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी अनुज्ञापन अधिक्षक कार्यालयाअंतर्गत मुंबईतील 24 विभाग कार्यालयांमध्ये 24 वरिष्ठ निरिक्षक, 125 वाहन निरिक्षक, 70 वाहने आणि सुमारे 250 कामगार कार्यरत आहेत.
- प्रत्येक विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात सातत्याने तक्रारी येत असतात. मात्र स्थानिक राजकारणी, फेरीवाल्यांचे नेते यांच्या दबावामुळे विभागीय स्तरावरील कारवाईला मर्यादा येतात. त्याचा परिणाम आज प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो.म्हणून मुंबई शहरातील फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्यासाठीच मुंबई स्पेशलची निर्मिती करण्यात आली होती.
‘मुंबई स्पेशल’ काय आहे
- मुंबई महापालिकेच्या 24 विभागांमध्ये बेकायदेशीर फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यासाठी अनुज्ञापन अधिक्षक मुख्य कार्यालय यांच्या अखत्यारित मुख्य कार्यालय दक्षता पथक स्थापन करण्यात आले. ‘मुंबई स्पेशल’ या नावाने ओळखला जाणारा हा विभाग सुमारे 30 वर्षे कार्यरत होता. 1 वरिष्ठ निरिक्षक, सहा कामगार, 2 वाहने,पोलीस इतका मर्यादीत ताफा आहे. मुंबई स्पेशल पथकाला मुंबईच्या 24 विभागांमध्ये कोठेही अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची परवानगी होती. या पथकाची परिणाकारकता अधिक असल्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये त्याची जरब होती.
- या विशेष पथकाने कारवाई केल्यानंतर जप्त केलेला माल एका विभागातून दुसऱ्या कोणत्याही विभागामध्ये हलविला जातो. त्यामुळे स्थानिक राजकारणी, फेरीवाल्यांचे नेत्यांना दुसऱ्या विभागात जाऊन हस्तक्षेप करणे शक्य होत नाही. शिवाय कारवाईपोटी सुमारे 10 हजार रुपयांपर्यंतचा दंडही वसूल केला जातो. त्यामुळे मुंबई स्पेशल अनधिकृत फेरीवाल्यांसाठी डोकेदुखी ठरले होते.
- साधारणपणे मे महिन्यात ए विभागातील मुख्य कार्यालय दक्षता पथक (394) कडून फेरीवाल्यांबाबतचा अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आला होता. मात्र हा अहवाल फेरीवाल्यांना अनकूल असल्याचा ठपका ठेवत महापालिका प्रशासनाने मुख्य कार्यालय दक्षता पथकातील 2 निरीक्षक आणि ए विभागतल्या वरिष्ठ निरीक्षकाला निलंबित केले. मात्र त्याचवेळी मुंबई स्पेशल पथकही बंद करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. अनधिकृत फेरीवाल्यांच्या नेत्यांच्या दबावामुळे ‘मुंबई स्पेशल बंद करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
- दरम्यान, एकीकडे स्वच्छ भारत अभियानासाठी मुंबई महापालिका प्रशासन कचरा आणि कचरा करणाऱ्या घटकांशी दोन हात करीत आहे. तर दुसरीकडे मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात फोफावणाऱ्या अनधिकृत फेरीवाले आणि त्यांच्याकडून होणाऱ्या कचऱ्याची समस्या महापालिका प्रशासन कशापद्धतीने सोडवणार ? अथवा मुंबई स्पेशल विभाग पुन्हा सुरू करणार की एखादा नवा पर्याय निर्माण करणार, यावर मुंबई शहराच्या स्वच्छतेचे आणि फेरीवाला मुक्त मुंबईचे भवितव्य अवलंबून असणार आहे.