मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी
मीरा भाईंदर, 1 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
राज्यभरात विजयी पताका फडकावणाऱ्या भाजपच्या शिरपेचात मीरा भाईंदर महापालिका निवडणूक जिंकून आणखी एक तुरा खोवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यापासून नेत्यांपर्यंत साऱ्यांनीच कंबर कसली आहे. लोकांच्या विकासासाठी मीरा भाईंदर महापालिकेतदेखील भाजपची सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्रीदेखील प्रचारात सहभागी होणार आहेत. मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांच्या किमान दोन सभांचे नियोजन करण्यात येत असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बाबूल सुप्रियो आणि दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील दिग्गज मंडळीही प्रचारासाठी सज्ज झाली आहेत.
मीरा भाईंदरमध्ये एकाहाती विजय मिळवण्यासाठी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भाजपाची यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यभरात झालेल्या मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पनवेल आणि कल्याण डोंबिवली आदी महापालिका निवडणुकीत भाजपला चांगलेच यश मिळाले आहे. मीरा भाईंदर महापालिकेतही त्याचीच पुनरावृत्ती होईल, अशीच चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री आणि राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्री प्रचारात सहभागी होणार असल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
नरेंद्र मेहता यांनी मीरा भाईंदर विधानसभा स्वबळावर खेचून आणली होती. महापालिका निवडणुकीतही ते अशीच दमदार कामगिरी करतील, असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत साऱ्यांनाच आहे. त्यामुळेच मीरा भाईंदरची विजयश्री खेचून आणण्यासाठी संघटनात्मक ताकद उभी करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यासाठी राज्य मंत्री मंडळातील चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश बापट आणि जयकुमार रावल आदी नेत्यांच्या सभा घेण्याबाबतही चाचपणी सुरू आहे. त्यांच्या जोडीला कल्याण डोंबिवली आणि पनवेल महापालिका निवडणुकीत मोलाची कामगिरी करणारे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, संघटन मंत्री सतिश धोंड, मिरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे हे देखील प्रचारासाठी मेहनत घेणार आहेत.