मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
नवी दिल्ली, 30 जुलै 2017/AV News bureau :
पीक विमा योजना अधिक परिणामकारक होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकारने विमा कंपन्यांसाठी एक योजना आखली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. मन की बात या कार्यक्रमाच्या ३४ व्या भागात ते बोलत होते.
देशात लागू करण्यात आलेला वस्तू आणि सेवा कायदा अर्थात जीएसटी अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम करत आहे. ही केवळ एक सुधारणा नसून, प्रामाणिक संस्कृतीला बळ देणारी आणि सामाजिक सुधारणा करणरी गोष्ट असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील मुद्दे
- 2017 हे वर्ष निर्धार वर्ष करण्याचे आवाहन मोदी यांनी केले आहे. या ऑगस्ट महिन्यात, अस्वच्छता, दारिद्र्य, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवाद देशातून हद्दपार करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावे. “करो या मरो” ही आजची गरज नसून, नवा भारत घडवण्यासाठी एकत्र येऊन अथक प्रयत्न आणि परिश्रम करण्याचा निर्धार करणे महत्त्वाचे आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.
- येत्या 9 ऑगस्टला “संकल्प से सिध्दी” या महामोहिमेचा प्रारंभ करणार.
- यावर्षी 15 ऑगस्ट हा दिवस संकल्प-पर्व म्हणून साजरा व्हायला हवा आणि 2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतांना देशाचे परिवर्तन सिध्दीत झाले असेल, असे ते म्हणाले.
- 1942 ते 1947 ही पाच वर्ष जशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी निर्णायक होती, तशीच 2017 ते 2022 या वर्षांची भारताच्या भविष्यासाठी निर्णायक भूमिका असलीच पाहिजे असे ते म्हणाले. आणखी पाच वर्षांनी देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे.
- छोडो भारत आंदोलनाचा 75 वर्धापन दिन देशात यावर्षी साजरा होणार आहे आणि 9 ऑगस्ट 1942 ला काय घडले हे नवीन पिढीला माहिती असलेच पाहिजे असे पंतप्रधानांनी सांगितले.
- भारतीय सण आणि उत्सव सामाजिक सुधारणांची एक मोहिम आहेत. प्रत्येक सण हा गरीबातल्या गरीबाच्या आर्थिक स्थितीशी निगडीत असल्याचे त्यांनी सांगितले. रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेशोत्सव, चौथ चंद्र, दुर्गापूजा, दिवाळी आदी उत्सवादरम्यान गरीबांना उत्पन्न मिळण्याची संधी मिळते आणि यामुळे सणांच्या उस्फूर्त आनंदात भरचं पडते असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
- गरीबांना लाभ व्हावा म्हणून लोकांनी विजेच्या दिव्यांऐवजी पणत्यांचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरण स्नेही गणेशमूर्ती असल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. सण आणि उत्सवांना गरीबांच्या आर्थिक कल्याणाशी जोडण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले.
- लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. लोकमान्य टिळकांच्या योगदानाचे स्मरण व्हावे यासाठी निबंध स्पर्धा घ्याव्यात तसेच, खुली चर्चा व्हावी असे आवाहनही त्यांनी केले.
- भारताच्या लेकी सर्व क्षेत्रांमध्ये देशासाठी गौरवशाली कामगिरी करत असून भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकत्याच झालेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गौरवास्पद कामगिरी केली आहे.
- यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन भाषणासाठी लोकांनी आपल्या संकल्पना “मायओव्ही किंवा नरेंद्र मोदी ॲप”वर पाठवाव्या असे पंतप्रधानांनी सांगितले. लाल किल्ल्याच्या प्रागंणातून जेव्हा आपण देशाला संबोधित करतो तेव्हा आपण 1 अब्ज 25 कोटी देशवासियांचा एकत्रित आवाज असतो, असेही पंतप्रधान म्हणाले. यावर्षी आपण आपले भाषण मर्यादित ठेवणार असून ते 40 ते 50 मिनटांपेक्षा जास्त नसेल, असेही पंतप्रधान म्हणाले.