रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची माहिती
शिर्डी,30 जुलै 2017/Av News Bureau:
यंदाच्या वर्षी 810 कोटी लोकांनी रेल्वेने प्रवास केला असून, एका दिवसाला अडीच ते तीन कोटी लोक रेल्वेने प्रवास करत आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सोयीसुविधांच्या वाढीवरही भर देण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.
साईनगर शिर्डी ते मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाडीला प्रभू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे आदि मान्यवर उपस्थित होते.
देशात रेल्वेच्या विकासाला गती देण्याबरोबरच महाराष्ट्रात रेल्वेच्या विकासासाठी एक लाख, 36 हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प सुरू असल्याचेही प्रभू यांनी यावेळी सांगितले. देशभरातून लोक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात. त्यासाठीच रेल्वेच्या माध्यमातून शिर्डी येथे अनेक सोई सुविधांच्या उभारणीवर भर देण्यात येत असल्याचेही सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितले.