मुंबई, 28 जुलै 2017/AV News Bureau:
राज्यातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना केंद्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये स्पर्धा करण्याच्या दृष्टीने 11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात व मूल्यमापनात आवश्यक बदल करण्यात येणार असून, राज्यातील अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली.
राज्यातील अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर करण्याच्या शासनाच्या निर्णयाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नावर विनोद तावडे यांनी उत्तर दिले.
उच्च माध्यमिक स्तरावर 11 आणि 12 वी ला दरवर्षी वेगवेगळी परीक्षा घेण्यात येते. एनईईटी आणि जेईईच्या परीक्षेसाठी विद्यार्थी सक्षम व्हावा या उद्देशाने 11 वी व 12 वी विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम सीबीएससीच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमात होणा-या बदलांमुळे नवीन पाठ्यपुस्तके शाळेत उपलब्ध केली असून, ज्या शाळांना डेपोतून पुस्तके घ्यावी लागत होती त्यांना ती पुस्तके पोहोचण्यास उशीर झाला आहे. मात्र, आता पुस्तके उपलब्ध असल्याची माहितीही तावडे यांनी दिली.
जून 2018 नंतर इंटीग्रेटेड कोर्सचे विद्यार्थी होणार १२ वीच्या परीक्षेतून बाद
मुंबई, नागपूर, पुण्यासोबत राज्यात अनेक ठिकाणी इंटीग्रेटेड कोर्स सुरू आहेत. ज्या कनिष्ठ महाविद्यालयात असे शिक्षणक्रम सुरू आहेत. अशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. जून २०१८ नंतर इंटीग्रेटेड कोर्सच्या विद्यार्थ्यांना बाद करण्यात येईल व त्यांना १२ वीच्या परीक्षांना बसता येणार नाही, अशी माहितीही तावडे यांनी विधानसभेत दिली.