मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नागरिकांकडून विकासाच्या संकल्पना

 भाजपच्या मेरा शहर मेरा सुझावला उत्तम प्रतिसाद

मीरा भाईंदर, 28 जुलै 2017/AV News Bureau:

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा जाहीरनामा तयार करण्यासाठी मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने राबविलेल्या ‘ मेरा शहर मेरा सुझाव’ या उपक्रमाला मीरा भाईंदरवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाद्वारे सूचना मागविण्यात येत आहेत. या सूचना पाठवण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत असून त्यानंतर या सूचनांवर विचारविनिमय करून त्यांचा समावेश जाहीरनाम्यात करण्यात येणार आहे.

मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील जनतेला अपेक्षित असलेल्या विकासाच्या संकल्पना जाणून घेण्यासाठी सूचना मागविण्यात येत आहेत. नागरिकांना या विकास प्रक्रियेत सामिल करून घेतल्याबद्दल मीरा भाईंदरवासियांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचे अभिनंदनही केले आहे.

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या अभियानामध्ये मीरा भाईंदरवासियांकडून आलेल्या सूचनांमध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा, रस्ते, वीज, वाहतुक कोंडी, उद्याने, क्रिडांगणे, बाजारपेठा, परिवहन सेवा, रुग्णालये, पार्किंगचा प्रश्न, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन तसेच शिक्षण या विषयांवरील आहेत. याशिवाय मीरा भाईंदर शहरवासियांसाठी महत्त्वाच्या अशा मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास यासारख्या धोरणात्मक बाबींवरही महत्त्वपूर्ण सूचना आहेत. महापालिकेत सत्ता आल्यास या जाहीरनाम्यानुसार पुढील पाच वर्षे आमचे नगरसेवक शहराच्या विकासासाठी झटतील, अशी ग्वाहीदेखील आमदार मेहता यांनी दिली आहे.