भाजपाच्या साथीने सत्ता स्थापन करणार
पटना, 27 जुलै 2017/AV News Bureau:
संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी आज सहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून तर भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतली. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी पटना येथील राजभवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी प्रसाद यादव भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी राजीनामा देत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काल नितीशकुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बिहारच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत गेल्या. सत्ता स्थापनेसाठी त्यांनी काल रात्रीच राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता बिहारमध्ये जेडीयू आणि भजपाची सत्ता असणार आहे.
132 आमदारांच्या पाठिंब्यासह 243 सदस्यांच्या विधानसभेत एनडीएला बहुमत सिद्ध करण्यासाठी 122 आमदारांचा दिलासा मिळाला आहे. सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी नितीशकुमार यांना दोन दिवसांचा कालावधी दिला आहे.
दरम्यान, तेजसवी यादव यांनी आज सकाळी राज्यपालांची भेट घेतली. भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याबद्दल त्यांनी कुमार यांच्यावर टीका केली आहे.