शिथिल केलेली अट पुन्हा लागू करण्यासाठी केंद्राला विनंती
गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील
मुंबई, 26 जुलै 2017/AV News bureau : मानवी तस्करी रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्यात येणार असून यासाठी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची सूचना करण्यात येईल. तसेच तस्करी झालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना परत आणण्यात येईल. याशिवाय पासपोर्ट बनविताना अल्पवयीन मुलांच्या पोलीस व्हेरिफिकेशनची शिथिल केलेली अट पुन्हा लागू करावी, यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज दिली.
मुंबईसह देशभरातील अल्पवयीन मुलांची तस्करी करणारी टोळी पकडली गेली असून 34 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन पालकांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
मानवी तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये कडक शिक्षेची तरतूद करण्याबाबत विधी व न्याय विभागाचे मत मागवून तशी शिफारस करण्यात येईल. कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये मूल हरविल्याची तक्रार आल्यास त्याची गांभीर्याने आणि त्वरीत दखल घेण्यात यावी, अशा सूचनाही संबंधितांना देण्यात येतील,असेही पाटील यांनी सभागृहात सांगितले. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते.