1 लाख लोकांच्या सुरक्षेसाठी 168 पोलीस

नव्याने पोलिसांची पदे निर्माण करण्यास मान्यता-मुख्यमंत्री

मुंबई,26 जुलै 2017/AV News Bureau:

राज्याची लोकसंख्या सुमारे 12 कोटींच्या आसपास असून त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत आहे. त्यामुळे 1 लाख लोकांच्या रक्षणासाठी केवळ 168 पोलीस कर्मचारीच उपलब्ध होत असून लवकरच नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली.

राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या संख्येत वाढ करण्याबाबतचा तारांकीत प्रश्न हेमंत टकले, धनंजय मुंडे आणि अन्य सदस्यांनी उपस्थित केला होता.

राज्याची लोकसंख्या लक्षात घेऊन राज्य पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विविध संवर्गातील एखूण 61 हजार 494 पदे पाच टप्प्यात निर्माण करण्यासाठी तत्वतः मंजूरी देण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांनी याबाबतचा एकत्रित प्रस्तावही तयार केला आहे. त्याअनुषंगाने पहिल्या टप्प्यात 12 हजार 297 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय पोलीस महासंचालकांनी दुसऱ्या टप्प्यात 12 हजार 549 पदे निर्माण करण्याचा प्रस्तावही सादर केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

राज्याच्या वित्त विभागानेही 25 मे रोजी पोलीस दलाचा आकृतीबंध निश्चित करून प्रस्ताव फेरसादर करण्याचा अभिप्राय दिला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.