5 ऑगस्टपूर्वी मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे बुजवा

मुंबई, 25 जुलै 2017/AV News Bureau:

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी 5 ऑगस्टपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व खड्डे बुजवा, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिले आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरूस्तीबाबत सोमवारी  विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पाटील यांनी रस्ते दुरूस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

गणेशोत्सव काळात कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खूप असते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकीतही मोठया प्रमाणात वाढ होते. मात्र महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्याचा त्रास प्रवाशांना होत असतो. ही बाब लक्षात घेवून गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व खड्डे बुजवा आणि रस्ते दुरूस्त करा, असे आदेश पाटील यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. रस्ते दुरूस्तीची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विनंतीवरून सायन-पनवेल महामार्गावरील रस्त्यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येण्यात येणार आहे.