मुंबई, 25 जुलै 2017/AV News Bureau:
राज्यात सायबर गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल 5 हजार 732 सायबर गुन्हे घडले असून आतापर्यंत 3 हजार 736 गुन्हेगारांना अटक करण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
सायबर आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुन्हे हे मोठे आव्हान आहे. या अनुषंगाने अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. सायबर गुन्ह्यांचा शोध अधिक परिणामकारकपणे व्हावा यासाठी सायबर कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्यभरात 47 सायबर लॅबची स्थापना करण्यात आली आहे. या लॅबना पोलीस ठाण्यांचा दर्जा देण्यात आला आहे. या सायबर लॅबमध्ये अत्याधुनिक तपास यंत्रे, साधनसामग्री तसेच इतर उपकरणे यांची खरेदी व पुरवठा प्रक्रिया सुरू आहे. सायबर गुन्ह्यांचा बिमोड करण्यासाठी शासनामार्फत पुढच्या पाच वर्षांसाठी 837 कोटी 86 लाख 7 हजार 350 रूपये खर्चाचा प्रकल्प राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचेही शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
बाळासाहेब थोरात आणि अन्य सदस्यांनी सायबर गुन्ह्यांबाबतचा तारांकीत प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता.