मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, 20 जुलै 2017/AV News Bureau:
राज्यात खाऱ्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाबरोबरच गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विकास विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोड्या पाण्यातील मत्सव्यवसायाला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
राज्यात मत्स्ययुक्त तलाव योजना सुरु कराव्यात. राज्यात 114 कोटी मत्स्य बिजाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात कमी प्रमाणात मत्स्यबीज उत्पादन होत असल्याने उर्वरित मत्स्यबीज इतर राज्यातून आयात करावे लागते. मत्स्यबीज उत्पादनात राज्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या फार्मस् वरील अतिक्रमणांचे अचूक मोजमाप करण्यासाठी ड्रोणद्वारे सर्वेक्षण करावे,अशा सूचना त्यांनी दिल्या.
तलाव तेथे मासोळी योजनेसाठी डीपीसीमध्ये तरतूद करा
तलाव तेथे मासोळी योजना राज्यभरात जिल्हा पातळीवर राबविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये (डीपीसी) तरतूद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.